शेटफळेतील कोल्हापूर पध्दतीच्या दोन्ही बंधाऱ्याची कामे तातडीने पूर्ण करा: जलसंपदा मंत्री यांना साकडे 

 


आटपाडी: प्रतिनिधी-


आटपाडी तालुक्यातील शेटफळे ओढा पात्रात अपूर्णावस्थेत असलेल्या दोन्ही कोल्हापूर पध्दतीचे बंधारे तातडीने पुर्ण करण्याविषयीचे साकडे जलसंपदा मंत्री ना . जयंतराव पाटील यांना घालण्यात आले .
        राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आटपाडी तालुक्याचे नेते किशोर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपती पुररकार प्राप्त प्राध्यापक अरूण गायकवाड , श्रीकांत गायकवाड , मोहन गायकवाड इत्यादींनी इस्लामपूर येथे मंत्री महोदयांची भेट घेऊन वस्तुस्थिती कथन करणारे निवेदन दिले . 
         २००७ साली सुरू झालेल्या या दोन्ही बंधाऱ्यांचे काम २००९ पर्यतच चालले तथापि निधी अभावी गेली ११ वर्षे रखडले असून या कामावर सुमारे ८९ लाख रुपये खर्ची पडले असल्याचे निदर्शनास आणले .
      सुमारे ५०० एकर क्षेत्राला या कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याचा लाभ मिळू शकतो , शेटफळे परिसरातल्या छोटया छोटया वाडया वस्त्याना , आणि मोठया प्रमाणातल्या जवळच्या पशुधनाला पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असल्याने सात हजार लोकसंख्येचे शेटफळे ग्रामस्थ या बंधाऱ्याबाबत मोठी आस धरून आहेत .
            लवकरच याबाबत योग्य ती उपाययोजना करू असे आश्वासन मंत्री महोदयांनी दिल्याचे किशोर गायकवाड यांनी सांगीतले .