●लाॅकडाऊन दरम्यान लोणंद पोलिसांची शेकडो दूचाकींवर दंडात्मक कारवाई 



लोणंद प्रतिनिधी 
दि. ३१


●लाॅकडाऊन दरम्यान लोणंद पोलिसांची शेकडो दूचाकींवर दंडात्मक कारवाई 


●एक एप्रिल पासून लोणंद होणार पाच दिवसांसाठी पुर्णपणे लाॅकडाऊन.


●नगरसेवक व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे घेतला कठोर निर्णय. 


...कोरोनावर विजय मिळवायचाच असा निर्धार करीत लोणंद येथील नगरसेवक व प्रतिष्ठित व्यापाऱ्यांकडून एकत्रीत निर्णय घेऊन पाच दिवस लोणंद संपूर्णतः लाॅकडाऊन करण्याचे ठरवले आहे. 
सध्या राज्यभरात लाॅकडाऊन सुरू आहे . प्रशासन योग्य ती खबरदारी घेऊन लाॅकडाऊन अमलात आणत आहे. यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या तसेच फळे दुग्धजन्य पदार्थ आणि औषधे यांना सुट देण्यात आली आहे. मात्र या काही सुट दिलेल्या वस्तूंची कारणे पुढे करून अनेकजण नियमांचा गैरफायदा घेत जनतेच्या हितासाठी घेतलेले प्रशासनाच्या निर्णयांची पायमल्ली करताना दिसत आहेत. म्हणून या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी लोणंद येथील नगरसेवक आणि व्यापारी यांनी एकत्र येऊन दिनांक एक एप्रिल ते पाच एप्रिल या पाच दिवसात संपूर्णतः लाॅकडाऊन अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. 
मात्र हा प्रशासनाने घेतलेला निर्णय नसल्याने अनेकजण याबाबत संभ्रमित आहेत.
याच दरम्यान लोणंद पोलिसांनी वारंवार सूचना करूनही ग्रामीण भागातील लोकांचे लोणंदला येणे कमी झाले नाही तसेच लोणंद येथील अनेक दुचाकीस्वार विनाकारण रोडवर गाड्या घेऊन येत असल्याचे निदर्शनास आल्याने आज दि ३१ मार्च रोजी सकाळी लोणंद येथील सपोनि संतोष चौधरी व त्यांच्या सहकारी पोलिसांनी अशा मोकाट मोटारसायकल चालकांवर मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई केली. यावेळी पोलिसांनी शेकडो दूचाकींच्या चालकांवर कारवाई करून मोठ्या प्रमाणावर दंड वसुल केला.