आटपाडीच्या सरपंच वृषालीताई पाटील महिलांच्या खऱ्या पाठीराख्या   सौ . अनिशा जावीर यांची भावना 

 


आटपाडीच्या सरपंच वृषालीताई पाटील महिलांच्या खऱ्या पाठीराख्या  
सौ . अनिशा जावीर यांची भावना


आटपाडी दि .८ ( प्रतिनिधी ) 
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आटपाडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात घेतल्या गेलेल्या महिला आरोग्य तपासणी शिबीरात आटपाडीच्या सरपंच सौ . वृषालीताई धनंजय पाटील यांच्या मानवतावादी भूमिकेने अनेकांच्या अंत : करणाचा ठाव घेतला .
         अगदी लहान मुलीपासून वृध्द आजीपर्यत या शिबीरात आरोग्याची तपासणी केली गेली . सुमारे २४८ महिलांची तपासणी करून त्यांना औषधोपचार देण्यात आला तथापि तज्ञ डॉक्टर महोदयांच्या टीमने हे जरी नेक काम केले असले तरी या शिबीरात सरपंचाच्या नेकदिलाची चर्चा आहे . स्वतःच्या घरच्या समारंभात येणाऱ्या अतिथींची ज्या आत्मीयतेने , तन्मयतेने विचारपूस केली जाते , पाहुणचार दिला जातो त्याच तन्मयतेने सलग सहा तास उभ्या राहून शिबीरात येणाऱ्या प्रत्येक महिला भगिनीची आस्थेवाईकपणे चौकशी करून तिला काय होते आहे , प्रापंचिक गुजगोष्टी बरोबरच त्यांच्या पुढील विविध प्रश्नांवर उहापोह करीत आपणही त्यांच्यापैकीच आहोत असे सरपंच वृषालीताईनी दाखवून अनेकांची मने जिंकली . उपेक्षित, वंचित, मागास, अल्पसंख्याक , गरीब , कष्टकरी महिलांना सरपंचाच्या या कृतीने मोलाचा मायेचा ओलावा मिळाला , खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा झाल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या सौ . अनिशा रविकिरण जावीर , सौ . मुमताज असिफ ( बाबू ) खाटीक , सौ . नीलम प्रमोद करांडे यांनी या निमित्ताने दिली . 
        माता , पिता , बंधू , सखा , साथी, बहिण, मैत्रीण अशा अनेक रूपात आढळणाऱ्या परमेश्वराच्या कार्याचाच काही अंश वृषालीताई आपल्या कृतीतून व्यक्त करीत खरी मानव सेवा, ईश्वरी सेवाच करीत आहेत असे गौरवोद्गार सौ . अनिशा जावीर यांनी काढले .