खरसुंडनाथांच्या चौफेर विकासासाठी १०० कोटी रुपये मंजूर करा     

__________________________________


खरसुंडनाथांच्या चौफेर विकासासाठी १०० कोटी रुपये मंजूर करा
 
सादिक खाटीक यांचे राज्य शासनाला साकडे          ___________________________________


आटपाडी  दि . १३  (प्रतिनिधी ) 
  
 देशभर ओळखले जाणाऱ्या तिर्थक्षेत्र श्री .सिद्धनाथ खरसुंडीच्या चौफेर विकासासाठी शासनाने तातडीने १०० कोटी रुपये मंजूर करावेत अशी मागणी मुस्लीम खाटीक समाजाचे प्रदेशाध्यक्ष , सामाजिक कार्यकर्ते  सादिक खाटीक आटपाडी  यांनी शासनाकडे केली आहे.  
           राज्याचे मुख्यमंत्री ना . श्री . उध्दवजी ठाकरे , जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्याचे पालकमंत्री ना . श्री . जयंतराव पाटील यांना पाठविलेल्या खास निवेदनाद्वारे  सादिक खाटीक यांनी त्यांचे लक्ष वेधले आहे. 
               सांगली जिल्हयातल्या आटपाडी तालुक्यामध्ये खरसुंडी  येथे श्री .सिद्धनाथांचे  मोठे तीर्थक्षेत्र आहे . प्रत्येक रविवार , पोर्णीमा , नवरात्र , नाथ जन्मकाळ, श्री. जकाई यात्रा, पौष आणि चैत्र महिन्यात खरसुंडीत भरणाऱ्या मोठया यात्रांसह देशभरातुन वर्षभर २० लाखापेक्षा जास्त भावीक भक्त या तीर्थक्षेत्री ये -जा करतात . लहान - मोठया खिलार जनावरांच्या खरेदी विक्री उलाढालीच्या निमित्ताने येथील जनावरांच्या यात्रांमध्ये लाखो शेतकऱ्यांची खरसुंडी कडे ये - जा होत असते . तथापि खरसुंडी कडे येणारे आठ मुख्य रस्ते अरूंद आणि दुरावस्थेत आहेत . १ ) नेलकरंजी - खरसुंडी रस्ता २ ) झरे- खरसुंडी रस्ता ३ ) आटपाडी - खरसुंडी काळा पट्टा मार्गे ४ ) आटपाडी -खरसुंडी तडवळे मार्गे ५ ) विटा -खरसुंडी वलवण मार्गे ६ ) बलवडी - खरसुंडी रस्ता ७ ) आटपाडी -खरसुंडी कामथ मार्गे ८ ) करगणी -खरसुंडी बाळेवाडी मार्गे . हे आठ मार्ग दोन पदरी म्हणजे १०० फुटी केले पाहिजेत . खरसुंडीतील सर्व अंतर्गत रस्ते प्रशस्त बनविले पाहिजेत . नाथमंदिर ते बसस्थानक पर्यतच्या मुख्य पेठेचा रस्ता सासन काठी सोहळ्याच्या दरम्यान होणाऱ्या गर्दीचा विचार करून प्रशस्तच केला गेला पाहीजे .                            
खरसुंडी विकास आराखडा साकारताना खरसुंडी जवळच्या  चिंचाळे , मिटकी , धावडवाडी या गावांचा समावेश करून प्रथमतः खरसुंडी नगरपंचायत निर्माण केली पाहीजे ,खरसुंडी परिसरातल्या नेलकरंजी ते झरे पर्यतच्या सर्वच गावे वाडया वस्त्या ना लाभदायक ठरेल अशी जिल्हास्तरीय औद्योगिक वसाहत खरसुंडी परिसरात साकारली पाहीजे . दोन हजार लोक एकत्रित बसतील असे  बहुउद्देशीय सांस्कृतीक भवन खरसुंडीला उभारले पाहीजे . वेगवेगळ्या दिशांना व्यवसाय संकुल , धान्य- भुसार पेठ , भाजीपाला मार्केट , फुलशेती शेतकरी बझार , खरसुंडीच्या ३ किलोमीटर बाहेर  मटन , मासे , चिकन , अंडी , सुक्या मासळीचे  मार्केट निर्माण केले पाहीजे . खरसुंडी परिसराचा डोंगरी विभागात समावेश झाला पाहीजे . खरसुंडीत मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल जिल्हा रुग्णालय दर्जाचे उभारले पाहीजे . अॅडव्हांन्स लाईफ सपोर्टींग अॅम्बुलंन्स खरसुंडीत असली पाहीजे .केजी टु पीजी व व्यावसायीक शिक्षण संकुल , अॅग्रो टुरिझम सेंटर ,  पीकनिक पाँईट , ऑक्सीजन पार्क , बॉटनिकल गार्डन , कॅटल फॉर्म अॅग्रीकल्चर --  पशुवैदयकीय कॉलेज खरसुंडीची ओळख बनले पाहीजे , म्हसोबा चिंचाळे , धाकटी जकाई दरा , बलवडी घाट , घोडेखूर , कवर ठाण मंडले वस्ती मिटकी परिसराच्या विकासातून नाथ नगरी उभारली पाहीजे . 
 नाथ मंदिर मागच्या अडगळीच्या ठिकाणच्या स्वच्छता संकुलातील शौचालये , स्नानगृहे  जवळ रहात असलेल्या कर्मचाऱ्याच्या वास्तव्याने प्रायव्हशीच्या अभावी भावीक भक्तांकडून उपयोगातच आणल्या जात नाहीत . अन्य काही ठिकाणची सार्वजनिक स्वच्छतागृहे बंद अवस्थेत आहेत . शासकीय विश्रांतीगृहाची अत्यंत वाईट अशी दुरावस्था झाली आहे .दारूडे , जुगारी , प्रेमी युगलांचे आश्रयस्थान बनलेल्या या रेस्ट हाऊसची दारे खिडक्या काढून नेण्यापर्यत काहींची मजल गेली आहे . खरसुंडीच्या चार ही दिशांना , बसस्थानक परिसरात सुलभ शौचालय , स्नानगृह आणि भक्तांना राहण्यासाठीची पुरेशी व्यवस्था नसल्याने भावीकांची मोठी कुचंबना होत असते .आपलेच वावर समजून जीव मोकळा करणारे येथे शेकडो पुरुष आढळतील . तथापि माता , भगिनी , लहान मुलांचे मोठे हाल होतात. बसस्थानक परिसर आणि गावच्या चारही दिशेला पुरूषांसाठी पन्नास - पन्नास आणि महिलांसाठी पन्नास - पन्नास शौचालये , स्नानगृहे , बांधली गेली पाहीजेत . किमान १००० भक्तांना सहकुटूंब राहता यावे असे चार वेगवेगळ्या ठिकाणी सुसज्ज भक्त निवास बांधले गेले पाहीजे . किमान आठ वेगवेगळ्या ठिकाणी पे- पार्कींग व्यवस्थेद्वारे दुचाकी , चार चाकी वाहनांचे वाहनतळ , पार्कींग स्टॅड उभारली पाहीजेत ,याकडे सादिक खाटीक यांनी मान्यवरांचे लक्ष वेधले आहे .              
नाथ मंदिर परिसरातच सी . सी. टी.व्ही. कॅमेरे आहेत . संपूर्ण नाथ नगरी सी.सी. टी.व्ही . कॅमेऱ्यांच्या कक्षेत येण्यासाठी पावले टाकली गेली पाहीजेत . सासन काठी आणि पालखी मिरवणूक सोहळ्याच्या यात्रा काळात होणाऱ्या प्रचंड गर्दीतल्या चेंगराचेंगरी आणि उधळलेले नवसाचे नारळ , खोबरे लागून तीन वर्षापूर्वी ७१ लोक जखमी झाले होते . चेंगराचेंगरीत एकाचा झालेला मृत्यू *देवाच्या दारात मरण आले* हे भाग्याचे समजून नातलगांनी त्याची नोंद न केल्याने सदरचा प्रकार चव्हाट्यावर आला नव्हता. ही घटनाही तीन वर्षा पूर्वीचीच आहे . तर भांगेतून झालेल्या विषबाधेने ४५ जणांना काही दिवस दवाखान्यात उपचार घ्यावे लागले होते . हा प्रकारही ४ वर्षापूर्वीचा आहे .
                   खरसुंडी गावास होणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा शुध्द असतो का ? तसेच मंदिराच्या आवारात मिळणारे पाणी शुध्द असते का ? हे ही पाहणे महत्वाचे आहे . पर्यटन विकास योजनेअंतर्गत भक्तांच्या निवासाच्या २५० खोल्या आणि जलशुध्दीकरण प्लँट साठी मंजूर झालेले जवळपास ३  कोटी रूपये जागा उपलब्ध न झाल्याने परत गेल्याचे सांगीतले जाते , याची काळजी ना ग्रामपंचायतीला , ना देवस्थान कमेटीला , ना राज्यकर्त्या नेतेमंडळीना ., अशी स्थिती असल्याचे नागरीक बोलतात.               
खरसुंडी ग्रामपंचायत अस्तित्वात आली त्यावेळी गावामध्ये ८१ जागा शासकीय होत्या असे बोलले जाते . काही अपवाद वगळता या सर्व जागांवर अतिक्रमण केले गेल्याची नागरीकांमध्ये चर्चा आहे . अनेक धनदांडगे , जात दांडग्याच्या ताब्यात या जागा असल्याने शासनही त्यांचे काही करू शकत नसल्याने विविध विकास कामांसाठी येणारे करोडो रुपये जागेअभावी परत जात असतील तर ते भुषणावह नाही . खरसुंडीतील सर्व अतिक्रमणे तातडीने जमीनदोस्त करून या मोकळ्या होणाऱ्या जागांचा भावीक भक्तांच्या सोयी सुविधा करणेसाठी वापर केला गेला पाहीजे . देवस्थान लगतच असलेल्या देवाच्या बागेचा अंदाजे २ एकर जागेचा आणि चिंचाळे , घाणंद रोड लगतच्या सिमोल्लंगन माळाच्या अंदाजे २० एकर जागेचा उपयोग नाथ नगरीच्या सर्वांगीण विकासासाठी केला गेला पाहीजे, अशी लोकभावना आहे . खरसुंडी कडे येणाऱ्या आठही रस्त्यावर दर ३ किलोमीटरवर दिशादर्शक फलक लावणे ही काळाची गरज आहे . श्री . सिध्दनाथ देवस्थान व परिसराची महती व माहीती देणारी स्वतंत्र वेबसाईट तयार केली गेली पाहीजे . संपूर्ण गावात पाणी वाहून जातील अशा बंदिस्त , भुयारी गटारी तसेच संपूर्ण गावात लख्ख प्रकाश देणारे पथदिवे , गोरगरीबांना अल्प मोबदल्यात रोटी , कपडा , धान्य उपलब्ध करून देणाऱ्या मानवतेच्या बँकाही नाथनगरीची महती वाढविणाऱ्या ठरल्या पाहीजेत . जेनेरीक मेडीशीनची स्वस्त औषधी दुकान खरसुंडीत झाले पाहीजे ,असे स्पष्ट करून सादिक खाटीक यांनी नाथ नगरीच्या चौफेर , सर्वांगीण विकासासाठी शासनाने विशेष विकास आराखडयातून शंभर कोटी रुपये खर्चल्यास होणाऱ्या विकासाच्या जोरावर आणि भावीक भक्तांकडून येणाऱ्या देणग्यामधून ही रक्कम पाच - दहा  वर्षात शासनाला परत मिळविता येवू शकेल . त्यासाठीची पारदर्शकता शासनाने निर्माण केली पाहिजे . खरसुंडी नगरीच्या चौफेर विकासासाठी राज्य शासनाने १०० कोटी रूपये तातडीने उपलब्ध करून द्यावेत असा आग्रह सादिक खाटीक यांनी धरला आहे , दोन वर्षापूर्वी या मागणी साठी  तत्कालीन मुख्यमंत्री श्री . देवेंदजी फडणवीस यांच्याकडेही पाठपुरावा केल्याचे आणि २१ ऑगस्ट २०१८ रोजी आमदार जयंतराव पाटील साहेब यांनी ही याबाबत शासनाने उचित कार्यवाही करावी असे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांना पाठविल्याचे सादिक खाटीक यांनी सांगीतले .