राज्यात तालुकास्तरावर सुरू होणार शंभर रक्षक क्लिनिक लोणंद पॅटर्न राज्यात राबविणार 


लोणंद ( प्रतिनिधी) -   कोरोनाचा सामना करण्यासाठी लोणंदच्या सुमारे शंभर डॉक्टरांनी एकत्र येऊन  सुरू केलेले  'रक्षक क्लिनिक ' हे लोणंद मॉडेल राज्यात राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने  घेतला असुन  राज्यामध्ये  तालुकास्तरावर ‘इंडियन मेडिकल असोशिएशन’ व राज्य शासन यांच्यावतीने (आयएमए) शंभर ‘रक्षक’ क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांच्या समवेत आयएमएच्या राज्य पदाधिकारी यांच्या बैठकित घेण्यात आला. 
    त्यामुळे  लोणंद मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मिलींद काकडे  व इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नितीन सावंत यांच्या पुढाकाराने सुरू झालेला  लोणंद पॅटर्न राज्यात राबविला जाणार असल्याने लोणंदच्या डॉक्टरांचा डंका राज्यभर पोहचला आहे.
         संपूर्ण राज्यात कोरोनाने थैमान घातलेले असताना त्यावर मात करण्यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी आयोजित केलेल्या   इंडियन मेडिकल अशोसिएशनचे अध्यक्ष अविनाश भोंडवे व संबधित डॉ . रवि वानखेडकर , डॉ . मंगेश पाटे डॉ . नितीन सावंत , डॉ अशोक तांबे डॉ . पल्लवी बुटाला या पदाधिकाऱ्यासमवेतच्या  बैठकित विविध निर्णय घेण्यात आले.
   या निर्णया मध्ये  लोणंद मेडिकल असो . व इंडियन मेडिकल असो. शाखा - लोणंद निरा यांचे वतीने सुरू करण्यात आलेल्या रक्षक क्लिनिक प्रमाणे संपूर्ण राज्यात तालुका स्तरावर  आयएमएच्या वतीने रक्षक क्लिनिक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
    या वेळी ना.राजेश टोपे यांचे समवेत झालेल्या चर्चेत आयएमएचे अध्यक्ष डॉ. नितीन सावंत यांनी लोणंद मध्ये सुरू करण्यात आलेल्या रक्षक क्लिनिकचे फायदे सर्वाच्या लक्षात आणून दिले. रक्षक क्लिनिकमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होऊन सरसकट डॉक्टर व रुग्ण यांना संसर्ग होणार नाही . आदी माहीती दिली. तर शासनाच्या खांदयाला खांदा देऊन आम्ही डॉक्टर कोरोनाचा नायनाट करण्यासाठी लढणार आहे. असेही सांगितले.
     आयएमएच्यावतीने शहरी भागात मोबाईल आणि कम्युनिटी क्लिनिक तर ग्रामीण भागात तालुकास्तरावर  रक्षक क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे .  याक्लिनिक मध्ये ओपीडी सुरू करण्यात येईल. त्यासाठी राज्य शासनाकडून डॉक्टरांच्या सुरक्षेची आवश्यक ती साधने पुरविण्यात येणार , डॉक्टरांचे प्रश्न सोडविणार , पीपी कीट उपलब्ध करून देणार, राज्य पातळीवर समन्वय समिती स्थापन केली जाणार  असल्याचे  डॉ. राजेश टोपे यांनी सांगितले .
         लोणंदच्या डॉक्टरांनी अकरा दिवसापुर्वी सुरू केलेले रक्षक क्लिनिकचा लोणंद पॅटर्न आता संपूर्ण राबविला जाणार आहे. लोणंद पॅटर्न संपूर्ण राज्यात शासनाचे सहकार्याने राबविण्यात येणार असल्याने लोणंदच्या डॉक्टरांचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.