कोरेगाव (प्रतिनिधी) : संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाने रौद्र रूप धारण केले असून कोरोनाचा वाढता फैलाव नियंत्रणात आणण्यासाठी उद्या गुरुवार (दि. २३) पासून कोरेगाव शहरात येणारे सर्व रस्ते बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय कोरेगाव नगरपंचायतीने घेतला आहे.
पुणे, मुंबई सह राज्यातील बऱ्याच मोठया शहरात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे, सातारा जिल्ह्यातही हळूहळू रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारीच्या सूचना दिल्या असून कोरेगाव शहरात येणाऱ्या चारही बाजूंचे रस्ते बंद करून विनाकारण वाढणारी वाहतूक नियंत्रणात आणली जाणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी कीर्ती नलावडे, तहसीलदार रोहिणी शिंदे, पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, नगरपंचायतीचे मुख्यधिकारी अशोक कुंभार, हॉस्पिटल संघटनेचे डॉ. रमेश पाटील, डॉ. मिलिंद शहा, डॉ. राजेंद्र गोसावी, डॉ. आशुतोष बर्गे यांच्या माध्यमातून प्रभावी कृती कार्यक्रम आखला जात असून, स्थानिक नगरसेवक, नगरपंचायत कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, सोनेरी ग्रुप व इतर सामाजिक संघटनानीही त्यात प्रभावी योगदान दिले आहे.
कोरोना नियंत्रणासाठी ग्रामीण रुग्णालयासह शहरातील पाच मोठी खाजगी रुग्णालये सुद्धा प्रशासनाने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे, त्यासह शहरातील मॉडर्न हायस्कूल, आयटीआय इमारत, शिवछत्रपती आश्रमशाळा कॉरनटाईन साठी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोरेगाव पोलिसांनी यापूर्वीच टास्क फोर्स सुरु केला असून शहरातील पाच प्रमुख नाक्यावर गुरुवार पासून तपासणी नाके उभारून त्याठिकाणी बाहेरच्या नागरिकांना प्रवेश बंद करण्यात येत आहे, स्थानिक नागरिकांच्याही दुचाकी, चारचाकी, सायकल दिसतील तेथून ताब्यात घेण्यात येणार आहेत. त्यासाठी जादा पोलिस कुमकही पाचारण केली आहे. दर गुरुवारी कोरेगाव नगरपंचायतीने संपूर्ण लॉकडाऊन यापूर्वीच जाहीर केला असून उद्या कोणतीही सुविधा नागरिकांना मिळणार नाही. या नाकाबंदीच्या मोहिमेत शहरातील सर्व प्रभाग सीलबंद करण्यासाठी नगरपंचायतीने कंबर कसली असून प्रशासनाच्या मदतीने व सामाजिक संघटनेचे स्वयंसेवकांच्या सहकार्याने नागरिकांना रस्त्यावर फिरण्यास मज्जाव केला जाणार आहे.
कोरेगावमध्ये येणारे सर्व रस्ते उद्या पासून बंद* *कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी