पुराचे पाणी दुष्काळी भागाला देण्याच्या निर्णयाचे दुष्काळग्रस्तांकडून स्वागत
माणदेशी न्युज सेवा
आटपाडी-
पुराचे पाणी यंदा दुष्काळी भागाला देण्याच्या जलसंपदा मंत्री ना .जयंतराव पाटील साहेबांच्या निर्णयाचे स्वागत दुष्काळी भागातून होत असून या प्रश्नी अनेक वर्षापासून प्रिंट मिडीया , इलेक्ट्रॉनिक्स मिडीया वगैरेतून सतत आवाज उठविणाऱ्या सादिक खाटीक यांच्या प्रयत्नाला यश आल्याचे मानले जात आहे .
आजच्या काही दैनिकांमधून आलेल्या पुराचे पाणी दुष्काळी भागाला देण्याच्या बातमीने लाखो दुष्काळग्रस्तांना आनंदीत केले आहे . या निर्णयाबद्दल मंत्री जयंतराव पाटील साहेब आणि आघाडी सरकारचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे .
पावसाळ्यात कृष्णेच्या महापुराचे समुद्राला वाहून जाणारे पाणी दुष्काळी तालुक्यांना प्रतिवर्षी देण्याचा धोरणात्मक निर्णय मा .श्री.उध्दव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालील आपल्या आघाडी सरकारने तातडीने घ्यावा अशी आमची मागणी असल्याचे स्पष्ट करून राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक आटपाडी यांनी, गेल्या अनेक वर्षापासून या मागणीसाठी आपण आवाज उठवीत आल्याचे स्पष्ट केले .
ते पुढे म्हणाले , गेल्या वर्षी ९ ऑगस्ट या क्रांतीदिनी आटपाडी तालुक्यातील माझ्यासह सर्व पत्रकारांनी या मागणीसाठी लक्षवेधी धरणे आंदोलन केले होते . तथापि धोरणात्मक निर्णयासाठी मुख्यमंत्री महोदयांसमवेत बैठक घडवून आणण्याचे , आंदोलन थांबवते वेळी दिले गेलेले त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांचे आश्वासन हवेतच विरून गेले , ही वस्तूस्थिती आहे . स्वातंत्र्यपूर्व काळात दुष्काळाने पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या अनेक पिढया गारद केल्याच परंतू स्वातंत्र्यानंतरच्या सत्तरी पर्यत पाणी पाणी करणाऱ्या तीन पिढयांची वासलात लागली , शासनकर्त्याच्या अनास्था, दुर्लक्षामुळे दुष्काळग्रस्तांच्या अनेक पिढयांचे पैशात मोजता येणार नाही इतके प्रचंड नुकसान झाले आहे . वास्तवीक अनेक पिढयांची राखरांगोळी झालेल्या दुष्काळग्रस्तांना हे कृष्णेचे पाणी पुरेसे, वेळेत आणि मोफत दिले जाणे गरजेचे होते आणि आहे . तथापी पैसे भरणारांसाठीच पाणी अशा भूमिकेतून , पळीतनं आमटी अन् सळीतनं भाकरी. देण्याच्या सरकारी कंजुषीने दुष्काळी भागाची ससेहोलपट अद्यापही थांबलेली नाही .
सादिक खाटीक पुढे म्हणाले ,अनेक पिढयांच्या बरबादीची भरपाई म्हणून यापुढच्या किमान शंभर वर्षापर्यत दुष्काळग्रस्तांसाठी पिण्याचे , शेतीचे पाणी मोफत देण्याची भूमिका शासनकर्त्यानी घेतली पाहीजे. अलमट्टीची उंची वाढविण्याच्या आपल्या उपरोधीक मागणी मुळे पुराच्या पाण्याचा त्रास होणारे सधन भागातले लाखो बांधव दुष्काळग्रस्तांसाठीचा मोठा आवाज बनतील हीच निखळ अपेक्षा यामागे आपली होती , पुरग्रस्तांवर अन्याय करण्यासाठी अजिबात नव्हती . नदीकाठचा परिसर आणि पाणलोट क्षेत्रात पावसाळ्यात सुरू राहणाऱ्या संततधार पावसामुळे वाहून जाणाऱ्या कृष्णेतील जास्तीच्या पाण्याने दुष्काळी तालुक्यातील सर्व तलाव तातडीने भरून घेतले जावेत या मागणीने शासनाचे नेहमीच दरवाजे ठोठावले आहेत .
माजी मंत्री , लोकनेते राजारामबापू पाटील यांनी दुष्काळी भागात त्याकाळी निर्माण केलेले शेकडो गाव तलाव , मोठे तलाव ,सार्वजनिक विहीरी यावर पुरेसे समाधानी नसणाऱ्या राजारामबापुंनी, दुष्काळी भागाला कृष्णेचे पाणी पाटाने आणि उचलून देण्याचे, १०० टी . एम.सी. क्षमतेच्या खुजगाव धरणाचे पाहीलेले स्वप्न टोकाच्या विरोधाने सत्यात आले नाही . हे दुष्काळ भागाचे दुर्देव होते . १९९२ पासून सुरू झालेल्या क्रांतीवीर नागनाथअण्णां नायकवडीच्या पाणी चळवळीच्या लढयाने दुष्काळग्रस्तांच्या मागणीला मोठा आवाज मिळाला .चळवळीच्या धसक्यातून आकारास आलेल्या टेंभूला आणि पूर्वीपासून रखडलेल्या ताकारी, म्हैशाळ सारख्यां योजनांना अनुशेषाच्या जाचक अटीतून योग्य मार्ग काढत मोठा निधी खेचून आणण्यात श्री . जयंतराव पाटील साहेब, कै . आर आर आबा पाटील आणि के . पतंगराव कदम साहेब यशस्वी झाले . या सर्व योजना अंतिम टप्प्यात येऊन पोहचण्यास केवळ न केवळ जयंतरावसाहेबांची अभ्यासू, लढवय्यी आणि कणखर भूमिकाच यशस्वी झाल्याचे लाखो दुष्काळग्रस्त जाणून आहेत . दुष्काळग्रस्तांचे सुदैवानेच त्यांच्याकडे राज्याचा जलसंपदा विभाग आला आहे . या संधीचे दुष्काळग्रस्तांसाठी ते सोनेच करतील अशी अपेक्षा आहे .
सांगली , सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील १३ दुष्काळी तालुक्यांना सप्टेंबर नंतरच्या परतीच्या पावसावरच नेहमी निर्भर रहावे लागते . क्वचित प्रसंगी पाच दहा वर्षातून एकदा जुन, जुलैच्या शाश्वत पावसाचा या दुष्काळी पट्टयाला लाभ होतो . मागच्या काही वर्षात दुष्काळी तालुक्यातील अनेक तलाव कृष्णेच्या पाण्याने भरले गेले होते . कॅनॉल ,ओढे , नाले, ओघळी द्वारेच्या या पाण्याच्या प्रवासातून भरल्या गेलेल्या तलावांमुळे दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ ही झाला होता ही वस्तूस्थिती असली तरी सातत्याने प्रतिवर्षी ते नियमितपणे दिले जावे ही अपेक्षा दुष्काळग्रस्तांची राहीली आहे . जुन ते ऑक्टोंबरच्या शास्वत पावसाने कृष्णा आणि तिच्या उपनदया भरभरून वहात असतात . हे जास्तीचे पाणी न अडविल्यास अथवा न उचलल्यास ते समुद्राचा रस्ता धरत असते . सदरचे पाणी तातडीने उचलून विविध योजनांद्वारे दुष्काळी तालुक्यातील सर्व तलाव भरून दयावेत . त्यामुळे दुष्काळी तालुके पाण्याच्या दृष्टीने आश्वस्त होतील . दुष्काळ पडल्यावर अथवा पाणीटंचाई निर्माण झाल्यावर करोडो रुपये टँकर , बोअर , चारा छावण्या इतर तकलादू उपायांवर खर्चणाऱ्या शासनाने वाहुन चाललेल्या पाण्यावर खर्च केल्यास टंचाई , टॅंकर आणि छावण्या मधल्या भ्रष्टाचार आणि अमर्याद खर्चावर आपोआप निर्बंध येईल . तसेच महापूराने कृष्णाकाठच्या सधन भागाचे होणारे अरबो - खरबो रुपयाचे नुकसान , होणारी पशु, पक्षी, मानवी जीवितहानी टळू शकेल . त्याद्दष्टीने तातडीने यंत्रणा हलवून सदरचे वाहून जाणाऱ्या पाण्याने दुष्काळी तालुक्यातील तलावांना , लाखो शेतकऱ्यांना संजिवनी देण्यासाठीचा पुराच्या पाण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय आघाडी सरकारने तातडीने करावा आणि लाखो दुष्काळग्रस्तांचे आशीर्वाद घ्यावेत हीच प्रांजळ भावना आहे .
बापुंच्या स्वप्नातील *खुजगावचे धरण* दुष्काळग्रस्तांसाठीचे **साठवण धरण* म्हणून निर्माण केले जावे आणि महापुरातले कृष्णेचे जास्तीचे समुद्राला वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाला प्रतिवर्षी मोफत देण्यासाठी धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने करावा हीच मागणी आघाडी सरकारकडे करीत आहोत ,आणि लवकरच ती सत्यात उतरेल अशी खात्री असल्याचे सादिक खाटीक यांनी शेवटी म्हटले आहे .